विशेषण
विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्या नामाला ‘विशेष्य’ असे म्हणतात
उदाहरणार्थ : हुशार मुलगा, हिरवे रान, सुंदर फुल इ.
वरील उदाहरणांमध्ये मुलगा, रान, फुल, हे विशेष्य आहे.
नामाबद्दल जो शब्द विशेष किंवा अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादीत करतो अशा विकारी शब्दांना ‘विशेषण’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : हुशार मुलगा, हिरवे रान, सुंदर फुल इ.
विशेषण व त्याचे प्रकार |
विशेषणाचे पुढीलप्रमाणे एकूण सात प्रकार पडतात.
(१) गुणविशेषण
(२) संख्याविशेषण
(३) सार्वनामिक विशेषण
(४) विधी विशेषण
(५) नामसाधीत विशेषण
(६) धातूसाधीत विशेषण
(७) अव्ययसाधीत विशेषण
आता आपण या सर्व प्रकाराबद्दल सविस्तर माहिती घेऊया हे सर्व प्रकार कोणत्या आधारावर पडलेले आहे ते बघूया
(१) गुणविशेषण
जो शब्द नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखवितो त्यास आपण ‘गुणविशेषण’ असे म्हणतो.
उदाहरणार्थ : उंच डोंगर, सुंदर तरुण, गोड द्राक्षे.
(२) संख्याविशेषण
ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास ‘संख्याविशेषण’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : दोन कुत्रे, पाचवा वर्ग, काही लोक, सात पट रुपये इ.
आता ह्या संख्याविशेषणाचे आणखी पाच उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
(अ) गणवाचक संख्याविशेषण
(ब) क्रमवाचक संख्याविशेषण
(क) आवृत्तीवाचक संख्याविशेषण
(ड) पृथकत्ववाचक संख्याविशेषण
(इ) अनिश्चित संख्याविशेषण
(अ) गणवाचक संख्याविशेषण
ज्या विशेषणाचा उपयोग केवळ गणती करण्यासाठी किंवा मोजण्यासाठी होतो त्यास ‘गणवाचक संख्याविशेषण’ असे म्हणतात.
गणवाचक संख्याविशेषणाचे आणखी तीन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे
(i) पूर्णाकवाचक संख्याविशेषण
(ii) अपूर्णाकवाचक संख्याविशेषण
(iii) साकल्यवाचक संख्याविशेषण
(i) पूर्णाकवाचक संख्याविशेषण
पूर्ण अंकात ज्याची गणना होते त्यास ‘पूर्णाकवाचक संख्याविशेषण’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : अठरा भाषा, शंभर रुपये, चौपन मुले इ.
(ii) अपूर्णाकवाचक संख्याविशेषण
अपूर्णाकात ज्याची गणना होते त्यास ‘अपूर्णाकवाचक संख्याविशेषण’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : अर्धा लीटर पेट्रोल, पाव किलो पेढा, दोन पंचअंश मुली इ.
(iii) साकल्यवाचक संख्याविशेषण
असलेल्या तिथल्या वस्तूपैकी सर्व वस्तूंना ‘साकल्यवाचक संख्याविशेषण‘ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : तुम्ही पाचही, तुम्ही उभयता, तुम्ही दोघेही इ.
(ब) क्रमवाचक संख्याविशेषण
ज्या वेळी विशेषणे वस्तूच्या क्रम दाखवितात त्यांना ‘क्रमवाचक संख्याविशेषणे’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : पाचवा बंगला, तिसरा वर्ग, साठावे वर्ष,
(क) आवृत्तीवाचक संख्याविशेषण
ज्या वेळी विशेषण हे एखादया संख्येची किंवा वस्तूची किती वेळा आवृत्ती झाली आहे याचा बोध करून देतो तेव्हा त्याला ‘आवृत्तीवाचक संख्याविशेषण’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : द्विगुणीत आनंद, चौपदरी घडी, तिपेडी पोळी, दहापट रक्कम इ.
(ड) पृथकत्ववाचक संख्याविशेषण
ज्यावेळी विशेषण वेगवेगळा पृथक असा बोध करून देतात त्याला ‘पृथकत्ववाचक संख्याविशेषण’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : एक एक मुलगा, दहा दहा चा गट, चार चारांचा कळप इ.
(इ) अनिश्चित संख्याविशेषण
ज्या वेळी संख्याविशेषणे निश्चित अशी संख्या दाखवत नाही त्यांना ‘अनिश्चित संख्याविशेषण’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : काही लोक, इत्यादी देश, खुप साहित्य, सर्व मुले इ.
(३) सार्वनामिक विशेषण
सर्वनामापासून तयार होऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विशेषणास ‘सार्वनामिक विशेषण’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : कोणते गाव, आमची माणसे, तिच्या बांगड्या, कसला भाव इ.
(४) विधी विशेषण
नामानंतर येणाऱ्या विशेषणाला ‘विधी विशेषण’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : आजची पिढी बंडखोर आहे,
तो विद्यार्थी हुशार आहे,
(५) नामसाधीत विशेषण
नामापासून तयार होणाऱ्या विशेषणास ‘नामसाधित विशेषण’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : सातारी पेढे, नागपुरी संत्री, पैठणी शालु, समाधानी मनुष्य, काल्पनीक गोष्ट इ.
(६) धातूसाधीत विशेषण
धातूंना निरनिराळी प्रत्यय लागून बनलेले जे शब्द विशेषणाचे कार्य करतात त्यांना ‘धातूसाधीत विशेषण’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : (पीक) :- पीकलेला आंबा.
(रांग) :- रांगणारा मुलगा.
(हस) :- हसरी मुलगी.
(७) अव्ययसाधीत विशेषण
मुळ अव्ययांना सा, चा, ला, ई, ल हे प्रत्यय लागून बनलेल्या विशेषणाला ‘अव्ययसाधीत विशेषण’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : वरचा भाग, खालचा भाग, मागील चाक, पुढील रस्ता इ.