mpscschool.in

अश्मयुग व अश्मयुगीन कालखंड | Stone Age in Marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासामधील अत्यंत महत्त्वाचा असा अश्मयुग हा टॉपिक सविस्तर अभ्यासणार आहोत. यामध्ये आज आपण अगदी मुळापासून बघणार आहोत की नक्की अश्मयुग म्हणजे काय, अश्मयुगाचे मुख्य कालखंड नेमके किती व कोणते आहेत आणि त्या प्रत्येक कालखंडाचे महत्त्व काय आहे. तसेच या प्रदीर्घ काळात मानवाने निसर्गाशी जुळवून घेत असताना स्वतःला किती प्रगत केले होते, शिकारीपासून ते पशुपालनापर्यंत त्याला किती प्रमाणात नवीन कौशल्ये प्राप्त झाली होती आणि त्याने दगडाच्या साहाय्याने आपली प्रगती कशी साधली, या सर्व गोष्टींची माहिती आपण आज घेणार आहोत, तर चला आजचा हा अश्मयुग व अश्मयुगीन कालखंड हा टॉपिक सुरू करूया.

अश्मयुग व अश्मयुगीन कालखंड, पुराणाश्म युग, मध्याश्म युग, नवाश्म युग, Stone Age in Marathi, Ancient Indian History Marathi Notes, MPSC History Study Material, अश्मयुगाचे कालखंड आणि वैशिष्ट्ये, मानवी उत्क्रांती इतिहास मराठी

अश्मयुग म्हणजे काय?

अश्म म्हणजे दगड; प्राचीन काळात मानव हत्यारे बनवण्यासाठी दगडांची मदत घेऊ लागला होता. तो आपल्या दैनंदिन जीवनात याच हत्यारांचा उपयोग करत असे. ज्या काळात मानवाने मुख्यतः दगडांच्या हत्यारांचा उपयोग केला त्या काळाला आपण ‘अश्मयुग’ असे म्हणतो. हा काळ मानवी इतिहासातील सर्वात प्रदीर्घ टप्पा आहे. युरोपीय इतिहासलेखनात यालाच ‘स्टोन एज’ (Stone Age) म्हणतात. भारतीय संदर्भात हत्यारांच्या तंत्रज्ञानातील बदल, हवामानातील फरक आणि मानवी जीवनशैलीतील विकास यांनुसार याचे अनेक टप्पे पडले आहेत.

अश्मयुगात हळूहळू मानवाने अनेक कला व कौशल्ये अवगत केली. या काळातील मानवाच्या प्रगतीवरून व त्यांच्या हत्यारांच्या आकार आणि प्रकारावरून अश्मयुगाचे प्रामुख्याने तीन कालखंड पडले आहेत. त्यानंतरच्या काळात दगडाबरोबरच तांब्याची हत्यारे वापरली जाऊ लागली, त्या काळाचा समावेश ताम्रपाषाण युगात होतो. हे कालखंड पुढीलप्रमाणे –

(१) पुराणाश्म युग
(२) मध्याश्म युग
(३) नवाश्म युग
(४) ताम्रपाषाण युग

 

(१) पुराणाश्म युग | पुरापाषाण काळ | Paleolithic Age

  • पुराणाश्म काळ हा साधारण मानव उत्क्रांतीपासून इ. स. पूर्व ९००० पर्यंतचा काळ म्हणून ओळखला जातो.
  • या कालखंडातील मानव कुशल होता; तो आघात तंत्राने हत्यारे बनवू लागला होता.
  • या कालखंडातील मानव जीवन जगत असताना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी डोंगरावर किंवा नदीच्या किनारी वस्ती करून राहत असे. तसेच तो निसर्गनिर्मित गुहांमध्ये सुद्धा वास्तव्य करत होता.
  • या कालखंडातील मानवाला शेतीचे ज्ञान नव्हते; त्यामुळे उदरनिर्वाहासाठी तो मुख्यतः शिकार करत असे. शिकार करण्यासाठी तो दगडांच्या व हाडांच्या हत्यारांचा वापर करत असे.
  • या कालखंडातील हत्यारे बघितली असता असे लक्षात येते की, ती हत्यारे फक्त कठीण कवचाची फळे व प्राण्यांची हाडे फोडण्यासाठी उपयोगात येत असावीत. या कालखंडाच्या पूर्वार्धात मानव शिकार न करता मेलेल्या किंवा इतर जंगली प्राण्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांच्या मदतीने उदरनिर्वाह करत असावा.
  • या कालखंडाचे पुरावे मध्यप्रदेशमधील रायसेन जिल्ह्यातील भीमबेटका येथे आढळून आले आहे. भीमबेटका येथील गुहेत वास्तव्यादरम्यान भिंतीवर मानवाने तीक्ष्ण हत्याराने चित्रे कोरली आहेत. त्या चित्रांमध्ये प्राणी, पक्षी, मानवाचे दैनंदिन जीवन इत्यादींचा समावेश आहे.

पुराणाश्म युगाचे तीन उपकालखंड आहेत –

(I) निम्न पुराणाश्म युग
(II) मध्य पुराणाश्म युग
(III) उच्च पुराणाश्म युग

 

निम्न पुराणाश्म युग | Lower Paleolithic

या काळात हातकुऱ्हाड, छन्नी  आणि लहान गोल दगडी साधने तयार होत. सोहन नदीचे खोरे (आताचे पाकिस्तान) आणि नर्मदा खोरे येथे अशी साधने सापडली. हस्तकुऱ्हाडी संस्कृती हे याचे वैशिष्ट्य आहे.

 

मध्य पुराणाश्म युग | Middle Paleolithic

साधने प्रामुख्याने पात्यांपासून बनवली जाऊ लागली. टोकदार साधी हत्यारे, छन्नी व पात्यांचा वापर वाढला. भीमबेटकाची काही साधने याच काळातील आहेत.
 

उच्च पुराणाश्म युग | Upper Paleolithic

यात मानवाने लांब व समांतर धार असलेली पाती, बुधले व हाडांपासून बनवलेली अत्याधुनिक हत्यारे विकसित केली. याच काळात गुहाचित्रे काढण्याची कला बहरली. भीमबेटका येथील रंगीत चित्रे याच काळाची साक्ष देतात. याशिवाय राजस्थानमधील बागोर, एमपीतील आदामगड, उत्तर प्रदेशातील बेलन खोरे येथेही या काळाचे पुरावे मिळतात.
 

(२) मध्याश्म युग | मध्यपाषाण काळ | Mesolithic Age

  • पुराणाश्म युग आणि नवाश्म युग यांच्या मधील कालखंडाला आपण मध्याश्म युग म्हणून ओळखतो.
  • मध्याश्म युगाचा काळ हा साधारणतः इ. स. पूर्व ९००० ते इ. स. पूर्व ४००० पर्यंतचा काळ आहे.
  • या काळातील बुद्धिमान मानवाने आणखी एक पाऊल पुढे टाकत पशुपालन व नैसर्गिकरीत्या उगवलेल्या धान्याची कापणी करून उदरनिर्वाह करणे चालू केले.
  • या काळातील मानव वस्ती करून राहू लागले आणि मुख्यतः आहारात वनस्पतींचा वापर करू लागले.
  • मध्याश्म युगातील मानव शिकारीसाठी, मासेमारीसाठी, वनस्पती कापणी व तोडणीसाठी वजनाने हलकी व दीर्घकाळ टिकतील अशी छोटी व तीक्ष्ण हत्यारे लाकूड, जनावरांची हाडे व दगडापासून तयार करू लागला. या काळात मानवाने सुरी, विळा यांसारखी हत्यारे बनवली.
  • भारतात राजस्थानमधील बगोर, गुजरातमधील लांघणज आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाटणे येथे मध्याश्म युगातील अवशेष मिळाले आहेत.
  • मध्याश्म युगाची सर्वांत मोठी ओळख म्हणजे सूक्ष्माश्म साधने ही लहान आकाराची, तीक्ष्ण, भौमितिक (त्रिकोणी, चंद्राकृती) व अभौमितिक आकाराची अशी हत्यारे हाडांच्या किंवा लाकडी दांड्यांमध्ये बसवून चक्र, भाला, बाण व विळे बनवले जात.
  • या काळात प्रथमच मृतदेह पुरण्याची पद्धत आढळते. उत्तर प्रदेशातील सराय नहर राय व महादहा येथे सापडलेली मानवी सांगाडी मुद्दाम दफन केल्याचे स्पष्ट संकेत देतात.
  • बगोर (राजस्थान) येथे पशुपालनाचे (मेंढी-शेळी) सर्वात जुने पुरावे आहेत. आदामगड (मध्यप्रदेश) येथे पाळीव प्राण्यांची हाडे मिळाली आहेत.
  • पाटणे (महाराष्ट्र) येथून मत्स्य जाळ्यांचे अवशेष सापडले आहेत, जे मासेमारीची व्यापक सवय दर्शवतात.
  • लांघणज (गुजरात) येथे मृतदेहांसोबत शेळ्यांची शिंगे ठेवलेली आढळली, ज्यावरून धार्मिक भावना उदयास आल्याचे मानले जाते.
  • हवामानातील उष्णता व आर्द्रतेमुळे जंगले वाढली, तलाव व नद्यांमध्ये जलचर भरपूर होते; यामुळे मानवाला भटकंती कमी करून एका परिसरात दीर्घकाळ राहणे शक्य झाले.

 

(३) नवाश्म युग | नवपाषाण युग | Neolithic Age

  • नवाश्म युगाचा काळ हा इ. स. पूर्व ४००० ते इ. स. पूर्व १५०० पर्यंतचा आहे.
  • या काळात दगड घासून गुळगुळीत करून नवीन प्रकारची हत्यारे बनवली गेली. या काळात नवीन प्रकारची हत्यारे तयार करण्यात आल्यामुळे या काळाला नवाश्म युग म्हटले जाते.
  • या काळात मानवाने भटकंती पूर्णपणे बंद करून स्थायी जीवन जगण्यास सुरवात केली. हे मानव राहण्यासाठी दगड-मातीची चौरसाकृती घरे बनवत असत.
  • नवाश्म युगात शेती आणि पशुपालन ही त्यांची दैनंदिन जीवनपद्धती बनली. या कालखंडात पाळीव प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली होती.
  • मानवाने या काळात मातीच्या भांड्यांचा देखील वापर सुरू केला.
  • या काळात मानवाने रागी, गहू, तांदूळ यांचे उत्पादन घेणे सुद्धा सुरू केले होते.
  • भारतातील गंगेच्या खोऱ्यात आणि दक्षिण भारतात या काळातील अवशेष मिळाले आहेत.
  • बिहारमधील चिरांद येथे हाडांपासून बनवलेली विविध उपकरणे व तांदळाचे भरपूर अवशेष मिळतात.
  • दक्षिण भारतात मास्की, ब्रह्मगिरी, हल्लूर, पैय्यमपल्ली येथे नवाश्म वसाहती होत्या. येथे रागी, गहू, हरभरा यांची लागवड होती.
  • मातीची भांडी आधी हाताने बनवत, नंतर चाकाचा वापर सुरू झाला. काळी-तांबडी भांडी, मृदभांडांवर नक्षीकाम याचे पुरावे सापडतात.
  • या काळाच्या अखेरीस धान्य साठवणुकीसाठी धान्यकोठारे, चामखीळीचा शोध, वस्त्र विणणे यांसारखी तंत्रे विकसित झाली.
  • एकूणच नवाश्म युगाने मानवाला भटक्या जीवनाकडून ग्रामीण स्थायी जीवनाकडे नेले आणि संघटित समाजाचा पाया रचला.

 

(४) ताम्रपाषाण युग | Chalcolithic Age

  • नवाश्म युगाच्या शेवटच्या काळात मानवाने तांबे या धातूचा शोध लावला.
  • तांब्याचा शोध लागल्यामुळे मानवाने दगडासोबतच तांब्यापासून सुद्धा हत्यारे बनवण्यास सुरवात केली; म्हणून या काळाला ताम्रपाषाण युग असे म्हटले जाते.
  • या काळात मानवाने पाळीव प्राण्यांत प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळ्या पालनाला सुरवात केली.
  • मसूर, तांदूळ, गहू यांच्यासोबतच मानवाने या काळात कापूस या पिकाची सुद्धा शेती करणे सुरू केली.
  • या काळात मानवाने वस्त्रकला देखील अवगत केली होती.
  • भारतात अनेक प्रादेशिक ताम्रपाषाण संस्कृती उदयास आल्या –
    अहार-बनास संस्कृती (राजस्थान): अहार, बालथल येथे तांब्याच्या चुड्या, तलवारी, मणी.
    माळवा संस्कृती (मध्यप्रदेश): नवदाटोली, महेश्वर इथे रंगीत भांडी.
    जोर्वे संस्कृती (महाराष्ट्र): जोर्वे, दायमाबाद, इनामगांव येथे तांब्याची पन्हाळी, गोलाकार कुंभ, विटांची घरे.
    कायथा संस्कृती (मध्यप्रदेश): विशिष्ट चॉकलेटी रंगाची भांडी.

  • या संस्कृती प्रामुख्याने नदीकाठी बहरल्या. नियोजनपूर्वक वसाहती, मजबूत घरे, सार्वजनिक धान्यकोठारे आढळतात.

  • इनामगांव (महाराष्ट्र) येथे एका व्यक्तीला चार पायांच्या मातीच्या मांडवावर ठेवून दफन केल्याचा पुरावा मिळाला, जो सामाजिक स्तरीकरण दर्शवतो.

  • या काळात धातूशास्त्र विकसित झाले; तांबे वितळवून टाकून ठोकून आकार देण्याचे तंत्र ज्ञात होते.

  • एकूणच ताम्रपाषाण युगाने ग्रामीण जीवन अधिक सुसंघटित केले आणि पुढील लोहयुग व शहरीकरणाचा मार्ग मोकळा केला.

 

अशा प्रकारे आज आपण अश्मयुग व अश्मयुगीन कालखंड या टॉपिकचा सखोल अभ्यास केला असून मानवाच्या उत्क्रांतीचा हा टप्पा परीक्षेच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, हे तुम्हाला नक्कीच समजले असेल. आम्हाला खात्री आहे की हा लेख वाचल्यानंतर तुमच्या मनात अश्मयुगाबाबत असलेल्या सर्व शंका दूर झाल्या असतील. विद्यार्थी मित्रांनो, हा लेख तुम्हाला कसा वाटला आणि यातील माहिती तुम्हाला किती फायदेशीर ठरली, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तसेच, तुम्हाला अजून कोणत्या विषयावर सविस्तर लेख हवा असल्यास तेदेखील सुचवा. ही माहिती आपल्या इतर अभ्यासू मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल.

 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न / उत्तरे (FAQs)

प्रश्न १. अश्मयुग म्हणजे काय?

उत्तर: ज्या काळात मानवाने आपली शिकार, संरक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी मुख्यत्वे दगडांपासून बनवलेल्या हत्यारांचा वापर केला, त्या कालखंडाला ‘अश्मयुग’ असे म्हणतात.

प्रश्न २. अश्मयुगाचे मुख्य तीन कालखंड कोणते आहेत?

उत्तर: अश्मयुगाचे प्रामुख्याने (१) पुराणाश्म युग, (२) मध्याश्म युग आणि (३) नवाश्म युग हे तीन कालखंड पडतात.

प्रश्न ३. मानवाने अग्नीचा शोध कोणत्या काळात लावला?

उत्तर: मानवाने अग्नीचा शोध अश्मयुगाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच ‘पुराणाश्म युगात’ लावला.

प्रश्न ४. ‘सूक्ष्मास्त्रे’ कोणत्या कालखंडाचे वैशिष्ट्य आहे?

उत्तर: मध्याश्म युगामध्ये मानवाने अत्यंत लहान आणि तीक्ष्ण दगडी हत्यारे बनवण्यास सुरुवात केली होती, ज्यांना ‘सूक्ष्मास्त्रे’ असे म्हटले जाते.

प्रश्न ५. मानवाने शेती आणि स्थिर जीवनाला कधी सुरुवात केली?

उत्तर: मानवाने ‘नवाश्म युगात’ भटकंती थांबवून शेती करण्यास आणि एका ठिकाणी स्थिर वस्ती करून राहण्यास सुरुवात केली.

प्रश्न ६. ताम्रपाषाण युग म्हणजे काय?

उत्तर: ज्या काळात मानवाने दगडासोबतच ‘तांबे’ या धातूचा वापर करून आपली हत्यारे आणि अवजारे बनवली, त्या काळाला ‘ताम्रपाषाण युग’ म्हणतात.