mpscschool.in

हडप्पा संस्कृती: उगम, वैशिष्ट्ये आणि ऱ्हास | Harappan Civilization in Marathi

मित्रांनो, भारताचा इतिहास हा केवळ राजा-महाराजांच्या युद्धांची गाथा नाही, तर तो हजारो वर्षांपूर्वीच्या प्रगत मानवी संस्कृतीचा एक देदीप्यमान वारसा आहे. आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासातील अशा एका सोनेरी पानाबद्दल माहिती घेणार आहोत ज्याने जगाला नगररचना आणि शिस्तबद्ध जीवनशैली शिकवली  ती म्हणजे ‘हडप्पा संस्कृती’ (सिंधू संस्कृती). ५००० वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या खोऱ्यात उदयाला आलेल्या या महान संस्कृतीचा वारसा आजही आपल्याला थक्क करतो.

या सविस्तर लेखामध्ये आपण हडप्पा संस्कृतीची अद्वितीय नगररचना, काटकोनात छेदणारे रस्ते, त्या काळातील पक्क्या विटांची घरे, प्रगत सांडपाणी व्यवस्था आणि लोकांचे सामाजिक व धार्मिक जीवन यावर प्रकाश टाकणार आहोत. इतकेच नाही, तर त्यांचा परदेशांशी असलेला व्यापार, त्यांची प्रगत लिपी आणि शेवटी इतकी भव्य संस्कृती नष्ट का झाली, म्हणजेच ऱ्हासाची कारणे याबद्दलही आपण सविस्तर चर्चा करूया.

 

हडप्पा संस्कृती, हडप्पा संस्कृती माहिती, हडप्पा संस्कृती वैशिष्ट्ये, hadappa sanskruti, hadappa sanskruti mahiti, hadappa sanskruti rhasachi karane, हडप्पा संस्कृती ऱ्हासाची कारणे

हा विषय केवळ इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठीच नाही, तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. चला तर मग, वेळ न घालवता सुरुवात करूया आजचा टॉपिक हडप्पा संस्कृती.

हडप्पा संस्कृती माहिती

  • इ. स. १९२१ मध्ये पंजाब राज्यातील रावी आणि सिंधू नदीच्या काठी हडप्पा या शहरात उत्खननामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागल्या मुळे या संस्कृतीला  ‘हडप्पा संस्कृती’ असे नाव मिळाले.
  •  हडप्पा संस्कृतीचे बहुतांश अवशेष सिंधू नदीच्या काठी (किनाऱ्यावर) आढळून आल्यामुळे याला ‘सिंधू संस्कृती’ म्हणून देखील ओळखले जाते.
  • हडप्पा येथे झालेल्या उत्खननासोबतच हडप्पा शहराच्या दक्षिणेला काही अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे झालेल्या उत्खननामध्ये देखील सारखेच अवशेष आढळून आले आहे.
  • हडप्पा संस्कृती ही मुख्यत: तत्कालीन भारतातील पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात, जम्मू-काश्मीर इत्यादी प्रदेशात विस्तारित पणे आढळून आली आहे.
  • हडप्पा संस्कृती मधील पूर्ण नागरीजीवन हे रावी नदी, सिंधू नदी, आणि सिंधू नदीच्या उपनद्या घागरा व सरस्वती या नद्यांच्या काठी वसलेले आढळून आले आहे.
  • हडप्पा संस्कृतीचा कालखंड साधारणतः इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो.
  • हडप्पा संस्कृतीचा उगम कसा झाला कुठून झाला याची स्थापना कोणी केली याबद्दल अजूनही माहिती उपलब्ध नाही. त्यावर आता पण शास्त्रज्ञांचे संशोधन सुरु आहे.
  • तत्कालीन भारताच्या विविध ठिकाणी मिळालेल्या हडप्पा संस्कृतीची अवशेष, वस्तू व वास्तू व त्यांची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सारखीच आढळून येतात.

हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये

(१) घरे आणि नियोजनबद्ध नगररचना

  • हडप्पा संस्कृतीतील घरे उच्च कुलीन आणि सामान्य भागात विभागून होती. ती सर्व घरे मुख्यत: भाजलेल्या विटांनी बांधलेली आढळून आली आहे. काही घरबांधकामामध्ये दगडाचा देखील वापर दिसून आला आहे.
  • हडप्पा संस्कृतीतील पूर्ण नगर रचना अशा प्रकारे दिसून आली आहे की सर्व घरांच्या मध्यभागी चौक आणि आजूबाजूला सर्व घरे प्रत्येक घराच्या अंगणात स्नानगृहे, शौचालये आणि विहिरी आढळून आल्या आहे.
  • हडप्पा संस्कृतीतील प्रत्येक नगररचनेमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाची उत्तम सोय होती. पूर्ण शहरात भाजक्या विटांनी बनवलेली गटारे होती व ती पूर्ण पणे झाकलेली असत. या संस्कृतीतील लोक साफसफाई बद्दल किती जागरूक होते हे या वरून दिसून येते.
  • हडप्पा संस्कृतीत बहुतांश जागी सार्वजनिक ठिकाणांचा समावेश सुद्धा दिसून आला आहे. उदा सिधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे सार्वजनिक स्नानगृहे आणि धान्य कोठारे सुद्धा सापडली आहे. बहुतेक सार्वजनिक कार्यक्रम व धार्मिक पूजा करण्यासाठी या ठिकाणांचा उपयोग होत असावा.
  • हडप्पा संस्कृतीत सुरक्षतेची देखील काळजी घेतली जायची त्यासाठी पूर्ण शहराच्या सभोवताली संरक्षक तटबंदी दिसून येते.
  • हडप्पा संस्कृतीतील रस्त्याची रचना या प्रकारे करण्यात आली होती की ते रस्ते एकमेकाला काटकोनात मिळत असत आणि घरासमोरील रुंद रस्ते शहराच्या मुख्य रस्त्यांना जोडलेली आढळून आली आहे. रस्त्यांच्या कडे वरील अवशेषांवरून दिसून येते की रस्त्यांच्या कडेला दिव्याबत्तीची सुद्धा सोय असावी.

(२)महास्नानगृहे

  • हडप्पा संस्कृतीत सार्वजनिक स्नानगृहे होती. उत्खननामध्ये मोहनजोदडो येथे एका  महास्नानगृहाचे अवशेष सापडले. 
  • या स्नानगृहाची रुंदी ७ मीटर, लांबी १२ मीटर व खोली सुमारे २.५ मीटर मोजल्या गेली आहे. याच्या बाहेरच्या भिंती जवळपास ८ फूट रुंदीची आहे. त्यात खाली उतरण्याची आणि पोशाख बदलण्याची देखील व्यवस्था होती.
  • महास्नानगृहाचे अंघोळीसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था होती तसेच सांडपाणी व्यवस्थापन देखील होते. हे तेथील उत्खननात दिसून आले आहे. यावरून हडप्पा संस्कृतीतील लोक स्वच्छता आणि आरोग्याविषयी किती जागरूक होते हे लक्ष्यात येते.

(३) मुद्रा, भांडी, हत्यारे, कला, व तंत्रज्ञान

  • हडप्पा संस्कृतीतील लोकांचा शेती या प्रमुख व्यवसाय होता. शेती मध्ये ते प्रमुख्याने गहू, सातू, तांदूळ, राई, कापूस ही पिके घेत असे त्याचबरोबर वाटाणा, मसूर, तीळ ही पिके सुद्धा काढली जात असे.
  • हडप्पा संस्कृतीमध्ये बैल, म्हैस, शेळी, डुक्कर, गाढव, उंट यांसारखे प्राणी पाळल्या जात असत. त्याच बरोबर त्या काळात हत्ती, हरीण या प्राण्यांविषयी देखील त्यांना ज्ञान होते.
  • हडप्पा संस्कृतीतले लोक भारता सोबतच भारताच्या बाहेर सुद्धा व्यापार करत होते. सिंधु नदीच्या खोऱ्यात उत्तम प्रकारचा कापूस होत असे तो कापूस इजिप्त, पश्चिम आशिया, दक्षिण युरोप या सारख्या प्रदेशात निर्यात होत असे. हा व्यापार मुख्यत: जहाजाद्वारे अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. देशांतर्गत व्यापारासाठी जहाजाप्रमाणे बैलगाडींचा देखील वापर केला जाई.
  • हडप्पा संस्कृतीत मोजमापासाठी संपूर्ण प्रदेशात एकसारखीच उपकरणे उपयोगात आणल्या जायची. मोजमापासाठी विविध दगडांपासून बनवलेली मापे आणि उपकरनाचा वापर केला जात असे. त्यांच्या मोजमापात त दोराने उचलण्याच्या वजनापासून ते सोनाराने उपयोगात आणलेल्या लहानशा वजनापर्यंतचा समावेश दिसून येतो.
  • हडप्पा संस्कृतीमधील लोकांचा मुख्य आहार गहू होता पण ते पिकवत असलेले इतर पिके जसे तांदूळ, सातू, वाटाणा, यांचा देखील वापर आहारामध्ये करत असत. या काळातील लोक शेती बरोबर पशु पालन करत असल्या मुळे गाई म्हशीचे दुध व दुधापासून बनणाऱ्या पदार्थांचे सुद्धा ते आहारात घेत असे त्याच प्रमाणे त्या काळातील लोक मांसाहार देखील करत असे.

(४) शेती, व्यापार आणि लोकजीवन

  • हडप्पा संस्कृतीतील कला आणि तंत्रज्ञान खूप प्रगत असावे. कारण त्या काळात त्यांनी मुद्रा भांडी हत्यारे बनवणे या सर्व कला व तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे अवगत केले होते.
  • हत्यारे बनवण्यासाठी ते प्रामुख्याने ब्राँझ आणि दगडांचा उपयोग करत असत.
  • मुद्रा बनवण्यासाठी त्यांनी मुख्यत: स्टीएटाईट या दगडाचा वापर केला होता. उत्खननामध्ये सापडलेल्या बहुतेक मुद्रा प्रामुख्याने चौरस आणि स्टीएटाईट या दगडापासून बनलेल्या आढळल्या आहे. सर्व मुद्रांवर बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ, यांसारखे प्राणी बघायला मिळतात. त्याचप्रमाणे मनुष्याचीही प्रतिकृती मुद्रांवर आढळून येते.
  • हडप्पा संस्कृतीतील उत्खननामध्ये विविध प्रकारची आणि विविध आकाराची भांडी देखील सापडली आहे. भांडी बनविण्यासाठी चाकाचा वापर होत असे. या भांड्यांमध्ये लाल रंगाच्या भांड्यावर काळ्या रंगाने नक्षीकाम केलेली भांडी त्याच प्रमाणे माशांच्या खावाल्यापासून बनवलेली वर्तुळकार भांडी अश्या प्रकारची बरीच भांडी तेथे आढळून आली आहे.
  • या काळातील उत्खननामध्ये विविध आभूषणे देखील सापडलेली आहे या काळातील आभूषणे मुख्यत: सोने, तांबे, रत्ने, त्याचप्रमाणे कवड्या, शिंपले यापासून बनलेली असत. आभूषणामध्ये पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बांगड्या यांचा समावेश होता.
  • या काळातील मिळालेले पुतळे आणि कापडाचे अवशेष यांवरून असे लक्षात येते की या काळातील लोक कापड विनत असावेत. स्त्री आणि पुरुषांच्या पोशाखात गुढग्यापर्यंतच्या पोशाखाचा आणि दागिन्यांचा समावेश दिसून आलेला आहे.

(५) धर्म, संस्कृती आणि समाज

  • हडप्पा संस्कृती मधील काळात शस्त्रांची कमतरता असल्या मुळे लोक मनमिळाऊ आणि शांतीप्रिय होते. त्यामुळे समाजात जातीभेद सारख्या कोणत्याच रूढी परंपरा चालत नव्हत्या. मात्र गुलामगिरीची प्रथा त्याकाळी चालत असे.
  • त्या काळात स्त्रियांचा आदर केला जाई स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. स्त्रियांची देवता म्हणून पूजा केली जात असे.
  • स्त्रियांसोबतच त्या काळातील लोक नैसर्गिक शक्तीची देखील पूजा करत असत. पिंपळाचे झाड आणि एकशिंगी गेंडा या प्राण्यांची चित्रे उत्खननामध्ये दिसून आली आहे.
  • जाती धर्माबद्दल हडप्पा संस्कृतीमध्ये काहीही लिखित पुरावा उपलब्ध नाही तसेच मंदिरे किंवा इतर प्रार्थना गृहाचे देखील अवशेष उत्खननामध्ये आढळले नाही.
  • त्या काळात देखील मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत होती असे उत्खाननातून दिसून आले आहे.

 

हडप्पा संस्कृतीची ऱ्हासाची कारणे

हडप्पा संस्कृतीच्या सुरुवातीबद्दल ज्याप्रमाणे निश्चित माहिती उपलब्ध नाही, त्याचप्रमाणे तिच्या ऱ्हासाबद्दल सुद्धा कुठेच स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, या संस्कृतीचा शेवट इ.स.पू. १५०० मध्ये झाला असावा.

या संस्कृतीच्या ऱ्हासासाठी खालील मुख्य कारणे जबाबदार असावीत असे मानले जाते.

  • नैसर्गिक आपत्ती: भूकंप, महापूर आणि दुष्काळ ही संस्कृतीच्या ऱ्हासाची मुख्य कारणे असावीत.

  • नदी पात्रातील बदल: नद्यांचे पात्र कोरडे पडल्यामुळे किंवा नद्यांनी आपला मार्ग बदलल्यामुळे येथील लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले, ज्यामुळे ही शहरे उजाड पडली.

  • पर्यावरणीय बदल: समुद्रपातळीतील बदल हे देखील या संस्कृतीच्या विनाशाचे एक कारण मानले जाते.

  • परकीय आक्रमणे: परकीय टोळ्यांचे आक्रमण, विशेषतः आर्यांच्या आक्रमणामुळे या संस्कृतीवर मोठा परिणाम झाला असावा.

  • प्रशासकीय कमतरता: हडप्पा संस्कृतीमध्ये नियम व कायद्यांच्या कमतरतेमुळे देखील या संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा असे दिसून येते.

 

थोडक्यात सांगायचे तर, हडप्पा संस्कृती ही मानवी इतिहासातील एक अतिशय शिस्तबद्ध आणि प्रगत नागरी संस्कृती होती. जरी या संस्कृतीचा उगम आणि अंत आजही एका गूढ रहस्यासारखा वाटत असला, तरी उपलब्ध पुराव्यावरून त्यांच्या प्रगत नगररचनेची आणि समृद्ध वारशाची स्पष्ट जाणीव होते. नैसर्गिक आपत्ती, नद्यांच्या पात्रातील बदल, परकीय आक्रमणे आणि प्रशासकीय कमतरता यांसारख्या विविध कारणांमुळे या महान संस्कृतीचा अखेर ऱ्हास झाला असावा असे मानले जाते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न / उत्तरे (FAQs)

१. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?

उत्तर: हडप्पा संस्कृतीचा शोध १९२१ मध्ये दयाराम सहानी यांनी लावला. त्यांनी पंजाबमधील रावी नदीकाठी हडप्पा या शहराचे उत्खनन केले.

२. हडप्पा संस्कृतीला ‘सिंधू संस्कृती’ का म्हणतात?

उत्तर: या संस्कृतीची सुरुवातीची बहुतेक शहरे आणि वसाहती सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात सापडल्या, म्हणून याला ‘सिंधू संस्कृती’ असे म्हणतात.

३. हडप्पा संस्कृतीतील घरांची मुख्य वैशिष्ट्ये काय होती?

उत्तर: येथील घरे भाजलेल्या पक्क्या विटांनी बांधलेली होती. घरांच्या मध्यभागी चौक असे आणि प्रत्येक घरात स्वतंत्र स्नानगृह, शौचालय आणि विहिरीची सोय होती.

४. मोहेंजोदडो येथील सर्वात महत्त्वाचे अवशेष कोणते?

उत्तर: मोहेंजोदडो येथे एक भव्य सार्वजनिक स्नानगृह (The Great Bath) आणि धान्य कोठारे यांचे अवशेष सापडले आहेत.

५. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास का झाला?

उत्तर: इतिहासकारांच्या मते महापूर, भूकंप, दुष्काळ, नद्यांच्या पात्रातील बदल आणि परकीय आक्रमणे यांसारख्या कारणांमुळे या संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न / उत्तरे (FAQs)

खालील Link वर क्लिक करा 

इतिहासाची साधने