उभयान्वयी अव्यय
जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात त्या अविकारी शब्दांना ‘उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : त्याचे पत्र आले आणि मी निघालो.
तो येईल किंवा माधव येईल.
रमेश आला पण मला भेटला नाही.
उभयान्वयी अव्यायाचे एकूण आठ प्रकार पडतात ते आता आपण सविस्तर बघूया
(१) समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय
(२) विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय
(३) न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय
(४) परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय
(५) स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय
(६) कारण बोधक उभयान्वयी अव्यय
(७) उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय
(८) संकेत बोधक उभयान्वयी अव्यय
(१) समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय
दोन प्रधान किंवा मुख्य वाक्यांना जोडतांना त्यांचा समुच्चय करतात व पहिल्या विधानात आणखी भर घालतात त्यास ‘समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : शिक्षक आले व त्यांनी शिकवले.
विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
( आणि, आणखी, व, अन, शिवाय, न, नी, आणि )
(२) विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय
दोन किंवा अनेक गोष्टींपैकी कोणतेतरी एक म्हणजे हे किंवा ते असा अर्थबोध होतो तेव्हा त्यास ‘विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : तुम्ही चहा घ्याल की कॉफी घ्याल.
पाऊस पडो वा न पडो.
( अथवा, वा, की, किंवा, अगर )
(३) न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय
पहिल्या वाक्यात काही उणीव, दोष, कमीपणा असल्याचे सुचवितात असा अर्थबोध होतो त्यास ‘न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययास विरोधदर्शक असेही म्हणतात.
उदाहरणार्थ : शेतकऱ्याने शेती नांगरली पण पाऊस पडला नाही.
ताईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक आहे.
( पण, परंतु, परी, तरी, किंतु, बाकी )
(४) परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय
पहिल्या वाक्यात जे घडलेले सांगण्यात आले त्याचा परिणाम हा पुढील वाक्यात झाल्याचे सुचवितात म्हणजे दुसरे वाक्य हे पहिल्या वाक्याचा परिणाम असतो त्यास ‘परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : अतुलने मनापासून अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले.
तुम्ही त्याचा अपमान केला याकरिता तो तुमच्याकडे येत नाही.
( म्हणून, सबब, यास्तव, याकरिता, तेव्हा, तेव्हा, तत्मा, अत्यव )
(५) स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय
ज्या अव्ययवाने मागील शब्दाचे किंवा वाक्याचे स्वरूप उलगडून सांगितलेले असते त्यास ‘स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : एक रुपया म्हणजे शंभर पैसे.
तो म्हणाला की मी हरलो.
दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला.
(६) कारण बोधक उभयान्वयी अव्यय
ज्यातील दुसरे गौण वाक्य हे पहिल्या प्रधान वाक्याचे कारण आहे असा अर्थबोध होतो त्यास ‘कारण बोधक उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख काम केले.
आम्हाला हेच कापड आवडते कारण की स्वदेशी आहे.
(७) उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय
जेव्हा गौण वाक्य हे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असा अर्थबोध होतो तेव्हा त्यास ‘उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात.
उदाहरणार्थ : चांगली नौकरी मिळाली म्हणून तो पुण्याला गेला.
विजेते पद मिळावे यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले.
( सबब, कारण, की, यास्तव, म्हणून )
(८) संकेत बोधक उभयान्वयी अव्यय
ज्या उभयान्वयी अव्ययामुळे पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते व पहिले वाक्य गौण व दुसरे वाक्य मुख्य असते तेव्हा त्यास ‘संकेत बोधक उभयान्वयी अव्यय’ असे म्हणतात
उदाहरणार्थ : जर शळेत सुट्टी मिळाली तर मी खेळायला येईल.
तु लवकर घरी आलास म्हणजे आपण फिरायला जाऊ.