नमस्कार मित्रांनो आज आपण या भागात प्राचीन भारताच्या इतिहास मधील अश्मयुग हा topic अभ्यासणार आहे. आज आपण बघणार आहे की नक्की अश्मयुग म्हणजे काय, अश्मयुगाचे कालखंड किती व कोणते या काळात मानव किती प्रगत होता व त्याला किती प्रमाणात कौशल्य प्राप्त झाले होते तर चला आजचा topic सुरु करूया.
अश्मयुग व अश्मयुगीन कालखंड |
अश्मयुग म्हणजे काय ?
अश्म म्हणजे दगड; प्राचीन काळात मानव हत्यारे बनवण्यासाठी दगडांची मदत घेऊ लागला होता. तो आपल्या दैनंदिन जीवनात ह्याच हत्यारांचा उपयोग करत असे. ज्या काळात मानवाने मुख्यत: दगडांच्या हत्यारांचा उपयोग केला त्या काळाला आपण ‘अश्मयुग’ असे म्हणतो.
अश्मयुगात हळू हळू मानवाने अनेक कला व कौशल्ये अवगत केली या काळातील मानवाच्या प्रगती वरून व त्यांच्या हत्यारांच्या आकार आणि प्रकारावरून अश्मुगाचे प्रामुख्याने तीन कालखंड पडले आहे ते पुढीलप्रमाणे
(१) पुराणाश्म युग
(२) मध्याश्म युग
(३) नवाश्म युग
(१) पुराणाश्म युग | पुरापाषण काळ | Paleolithic Age
- पुराणाश्म काळ हा साधारण मानव उत्क्रांती पासून इ. स. पूर्व ९००० पर्यंतचा काळ म्हणून ओळखला जातो.
- या कालखंडातील मानव कुशल होता तो आघात तंत्राने हत्यारे बनवू लागला होता.
- या कालखंडातील मानव जीवन जगत असताना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी डोंगरावर किंवा नदीच्या किनारी वस्ती करून राहत असे. तसेच तो निसर्गनिर्मित गुहांमध्ये सुद्धा वास्तव्य करत होता
- या कालखंडातील मानवाला शेती चे ज्ञान नव्हते त्यामुळे उदरनिर्वाहासाठी तो मुख्यत: शिकार करत असे. शिकार करण्यासाठी तो दगडांच्या व हाडांच्या हत्यारांचा वापर करत असे.
- या कालखंडातील हत्यारे बघितली असता असे लक्षात येते की ती हत्यारे फक्त कठीण कवचाची फळे प्राण्याची हाडे फोडण्यासाठी उपयोगात येत असावी या कालखंडाच्या पूर्वार्धात मानव शिकार न करता मेलेल्या किवा इतर जंगली प्राण्यांनी शिकार केलेल्या प्राण्याच्या मदतीने उदरनिर्वाह करत असावा.
- या कालखंडाचे पुरावे मध्यप्रदेश मधील रायसेन जिल्ह्यातील भीमबेटका येथे आढळून आले आहे. भीमबेटका येथील गुहेत वास्तव्यादरम्यान भिंतीवर मानवाने तीक्ष्ण हत्याराने चित्रे कोरली आहे. त्या चित्रांमध्ये प्राणी, पक्षी, मानवाचे दैनंदिन जीवन इत्यादींच्या चित्रांचा समावेश आहे.
(२) मध्याश्म युग | मध्यपाषण काळ | Mesolithic Age
- पुराणाश्म युग आणि नवाश्म युग यांच्या मधील कालखंडाला आपण मध्याश्म युग म्हणून ओळखतो.
- मध्याश्म युगाचा काळ हा साधारणतः इ. स. पूर्व ९००० ते इ. स पूर्व ४००० पर्यंतचा काळ आहे.
- या काळातील बुद्धिमान मानवाने आणखी एक पाउल पुढे टाकत पशुपालन व नैसर्गिकरीत्या उगवलेल्या धान्याची कापणी करून उदरनिर्वाह करणे चालू केला.
- या काळातील मानव वस्ती करून राहू लागले आणि मुख्यत: आहारात वनस्पतींचा वापर करू लागले.
- मध्याश्म युगातील मानव शिकारीसाठी, मासेमारीसाठी, वनस्पती कापणी व तोडणीसाठी वजनाने हलक्या व दीर्घकाळ टिकतील अशी छोटी व तीक्ष्ण हत्यारे लाकूड, जनावरांची हाडे व दगडापासून तयार करू लागला. या काळात मानवाने सुरी विळा यांसारखी हत्यारे बनवली.
- भारतात राजस्थानमधील बगोर, गुजरात मधील लांघणज आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाटणे येथे मध्याश्म युगातील आवशेष मिळाले आहे.
(३) नवाश्म युग | नवपाषाण युग | Neolithic Age
- नवाश्म युगाचा काळ हा इ.स.पूर्व ४००० ते इ.स.पूर्व १५०० पर्यंतचा आहे.
- या काळात दगड घासून गुळगुळीत करून नवीन प्रकारची हत्यारे बनवली गेली. या काळात नवीन प्रकारची हत्यारे तयार करण्यात आल्यामुळे या काळाला नवाश्म युग म्हंटले जाते.
- या काळात मानवाने भटकंती पूर्णपणे बंद करून स्थायी जीवन जगण्यास सुरवात केली. हे मानव राहण्यासाठी दगड मातीची चौरसाकृती घरे बनवत असत.
- नवाश्म युगात शेती आणि पशुपालन ही त्यांची दैनंदिन जीवनपद्धती बनली. या कालखंडात पाळीव प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली होती.
- मानवाने या काळात मातीच्या भांड्यांचा देखील वापर सुरु केला.
- या काळात मानवाने रागी, गहू, तांदूळ यांचे उत्पादन घेणे सुद्धा सुरु केले होते.
- भारतातील गंगेच्या खोऱ्यात आणि दक्षिण भारतात या काळातील अवशेष मिळाले आहे.
(४) ताम्रपाषाण युग | Chalcolithic Age
- नवाश्म युगाच्या शेवटच्या काळात मानवाने तांबे या धातूचा शोध लावला.
- तांब्याचा शोध लागल्या मुळे मानवाने दगडासोबतच तांब्यापासून सुद्धा हत्यारे बनवण्यास सुरवात केली म्हणून या काळाला ताम्रपाषाण युग असे म्हटल्या जाते.
- या काळात मानवाने पाळीव प्राण्यात प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळ्या पालनाला सुरवात केली.
- मसूर, तांदूळ, गहू सोबतच मानवाने या काळात कापूस या पिकाची सुद्धा शेती करणे सुरु केली.
- या काळात मानवाने वस्त्र कला देखील अवगत केली होती.