नमस्कार मित्र मैत्रिनिनो आजच्या लेखात आपण महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती बघणार आहे. त्यामध्ये
सर्वप्रथम आपण उस्मानाबाद जिल्ह्याच्या इतिहास बघणार आहे,त्यानंतर आपण उस्मानाबाद जिल्ह्याची भौगोलिक माहिती, उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमा, उस्मानाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ, तालुके किती व कोणते, जिल्ह्याची लोकसंख्या , वनक्षेत्र, नद्या, धरणे, हवामान, पिके या सर्वांबद्दल माहिती घेणार आहे आणि शेवटी आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती बघणार आहे. तर चला सुरु करूया आजचा लेख उस्मानाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती |Osmanabad District Complete Information In Marathi
उस्मानाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती |
उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास
उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील आहे. जिल्ह्याला प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे सुरवातीचे
नाव धाराशिव’ किंवा ‘धारापूर’ असे होते. इ.स. १९१० मध्ये मीर-उस्मान अली या नावाच्या निझामाने या शहरास स्वत:चे नाव देऊन या जिल्ह्याचे ‘उस्मानाबाद’ असे नामकरण केले. उस्मानाबाद जिल्ह्याला प्राचीन काळापासूनची समृद्ध ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हा जिल्हा मौर्य साम्राज्याचा आणि सातवाहन वंशाचा एक भाग असल्याचे म्हटले जाते. सहाव्या शतकात या जिल्ह्यावर चालुक्य वंशाचे राज्य होते असे मानले जाते. मध्ययुगीन काळात जिल्ह्यावर बहमनी सल्तनतचे राज्य होते. १५ व्या शतकात, बहमनी सल्तनत पाच वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागली गेली होती. त्यापैकी एक बिदर सल्तनत होती. बिदर सल्तनतने उस्मानाबादवर मुघल साम्राज्याने विजय मिळेपर्यंत राज्य केले. उस्मानाबाद हा जिल्हा १९व्या शतकात ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली आला. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा हैदराबाद राज्याचा एक भाग होता. स्वातंत्र्यानंतर हा
जिल्हा बॉम्बे राज्याचा आणि नंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला.
उस्मानाबाद जिल्ह्याची भौगोलिक माहिती
उस्मानाबाद जिल्हा राज्याच्या दक्षिण भागात स्थित असून उस्मानाबाद हा जिल्हा मराठवाड्याच्या नैऋत्य बाजूला उत्तरेस १७.३५ ते
१८.४० डिग्री अक्षांश आणि पूर्वेस ७५.१६ ते ७६.४० डिग्री अक्षांश मध्ये स्थित आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा मुख्यत: भाग खडकाळ आहे आणि उर्वरित भाग हा सपाट आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून सुमारे उंची ६०० मीटर इतकी आहे.
जिल्ह्याचा बहुतांश भाग बालाघाट नावाच्या लहान पर्वताने व्यापलेला आहे. भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेतच आहेत. गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्यामध्ये येतो.
उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमा
उस्मानाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला बीड जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा, व दक्षिणेला कर्नाटक राज्यातील बिदर व
गुलबर्गा हे जिल्हे आहेत.तसेच नैर्ऋत्य-पश्चिमेला सोलापूर जिल्हा, आणि वायव्येला अहमदनगर हा जिल्हा आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ
उस्मानाबाद जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२.४ चौ.किमी आहे त्यापैकी शहरी भागाचे क्षेत्रफळ २४१.४ चौ.किमी म्हणजेच एकूण क्षेत्रफळाच्या ३.२१% भाग शहरी भाग असून ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ ७२७१.० चौ.किमी आहे आणि ग्रामीण भाग हा एकूण क्षेत्रफळाच्या ९६.७९% आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके
उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ८ तालुके आहे
१) परांडा २) भूम ३) उस्मानाबाद ४) तुळजापूर ५) कळंब ६) उमरगा ७) वाशी ८) लोहारा
या आठ तालुक्यांमध्ये एकूण ६२२ ग्रामपंचायती आहे. वाशी व लोहारा बुद्रुक ह्या २ नगरपंचायती आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या १६,५७,५७६ एवढी आहे. उस्मानाबादमध्ये ९२०/१०००
असे लिंग गुणोत्तर आहे म्हणजेच १००० पुरुषांमागे ९२० स्त्रिया आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा साक्षरता दर ७६.३३% आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील वनक्षेत्र
उस्मानाबाद जिल्ह्याला खूप कमी वनक्षेत्र लाभलेले आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या नुसार उस्मानाबाद जिल्ह्याच्या एकूण
क्षेत्रफळाच्या फक्त १.०४% क्षेत्र हे वनक्षेत्र म्हणून उपलब्ध आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील नद्या
उस्मानाबाद जिल्ह्यात मांजरा व तेरणा ह्या मुख्य नद्या आहे. बोरी, बाणगंगा, मन्याड, तावरजा आणि सीना या इतर नद्या आहे. मांजरा नदी ही गोदावरीची उपनदी असून उस्मानाबाद जिल्ह्यात तिच्या प्रवाहाची लांबी १०८·६ किमी. आहे. तेरणा उस्मानाबाद जिल्ह्याजवळ उगम पावते व पूर्व सीमेजवळ मांजरा नदीला मिळते. मन्याड व तावरजा या मांजराच्या उपनद्या ह्या अहमदपूर व लातूर तालुक्यांतून वाहतात. सीना नदी ही पश्चिम सीमेवरून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. परांडा व भूम भागातील चांदणी व इतर छोट्या नद्या आणि तुळजापूर तालुक्यातील बोरी व हरणी या सीना नदीच्या उपनद्या आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील धरणे
उस्मानाबाद जिल्हात तेरणा नदीवर बांधलेले तेरणा धरण असून ते माकणी गावाजवळ येते. भूम तालुक्यातील ताकमोड येथे वाटेफळ हे धारण असून भूम ताळूक्यातच रामगंगा आणि बाणगंगा ही धरणे आहे. त्याच प्रमाणे तुरोरा आणि रायगव्हाण ही उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाची धरणे आहे.शिवाय बीड जिल्यातील मांजरा प्रकल्पाचा फायदा देखील उस्मानाबाद जिल्ह्याला मिळतो.
उस्मानाबाद जिल्ह्याचे हवामान
उस्मानाबाद जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढलेला असून सर्वसाधारणपणे हवामान कोरडे व सौम्य आहे. पावसाळा सर्वसाधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर शेवटीपर्यंत असतो. उस्मानाबाद जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर. आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी थंड हवामानाचा काळ असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. परांडा व भूम महाल या घाटापलीकडील प्रदेशात पाऊस सुमारे ६० सेंमी. उस्मानाबाद, तुळजापूर, लातूर, उदगीर, अहमदपूर या तालुक्यांमध्ये सुमारे ९० सेंमी. औसा, उमरगा व निलंगा तालुक्यांत सुमारे ८० सेंमी. आणि कळंब तालुक्यात सुमारे ७o सेंमी. पडतो.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पिके
जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग शेती असून कामकरी लौकांपैकी ८०·१३ टक्के लोक शेतीव्यवसायात आहेत. ज्वारी आणि भुईमुग ही उस्मानाबाद जिल्ह्याची प्रमुख पिके आहे. भूम महाल, परांडा व तुळजापूर तालुक्यांत पिके अधिक होतात. कापूस, ऊस, तूर, मूग, गहू, हरभरा, अळशी ही पिके ही भरपूर प्रमाणात घेतली जातात. तसेच भात, मका, बाजरी, इतर कडधान्ये व गळिताची धान्ये, तंबाखू, मसाल्याची पिके व फळे आणि भाजीपाला यांचेही उत्पादन होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
तुळजा भवानी मंदिर
हे प्रसिद्ध भवानी देवीचे हिंदू मंदिर तुळजापूरात बाला घाटाच्या टेकडीवर आहे. हे ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत होते. आशीर्वाद घेण्यासाठी शिवाजी महाराज नेहमी मंदिरात येत असे. हे भवानीमातेचे मंदिर उस्मानाबादपासून २५ कि.मीवर.अंतरावर आहे.
येडेश्वरी देवीचे मंदिर
हे मंदिर कळंबपासून २० कि.मी.वर येरमाळा येथे आहे.
उस्मानाबाद
उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शस्मूद्दीन गाझी चा दर्गा एक प्रमुख ठिकाण असून येथे अनेक भाविक दर्शनाला येतात.
तेर (तगर)
जिल्ह्यापासून सुमारे २२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन काळात प्रदेशासी व्यापार संबंध असलेले तेर हे गाव
प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबाकाका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्रला ज्ञात आहे. या गावात जुने राहते घर असून तेरणा नदीच्या काठावर त्यांची समाधी असलेले मंदिर आहे. तर येथील कांही मंदिरे स्थापत्यशास्त्राच्या बांधकामामुळे प्रसिद्ध आहेत. गावाच्या
आग्नेय दिशेला श्री नृसिंहाचे एक जुने मंदिर आहे. तर गावच्या मध्यभागी त्रिविक्रमाच्या भव्य अशा मूर्ती समोर विष्णूची मूर्ती आहे.
परंडा
येथे परंडा हा पुरातनकालीन किल्ला असून त्या काळात निजामशाही ची राजधानी म्हणून याची ओळख होती. तसेच या गावी संतकवी हंसराज स्वामींचा मठ देखील आहे.
श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर, रामलिंग मंदिर,
नळदुर्ग किल्ला, संत गोरोबा मंदिर,
धाराशिव लेणी, नळदुर्ग
किल्ला, कुंथलगिरी येथील
जैन मंदिर, कन्हेरी
दत्तमंदिर, तसेच
नळदुर्ग येथील नर-मादी धबधबा प्रसिद्ध आहे.
संबंधित प्रश्न-उत्तरे
प्रश्न १ उस्मानाबादमध्ये कोणती
पिके घेतली जातात?
उत्तर : ज्वारी, भुईमुग,कापूस, ऊस, तूर, मूग, गहू, हरभरा, अळशी
ही पिके ही भरपूर प्रमाणात घेतली जातात. तसेच भात, मका, बाजरी, इतर कडधान्ये व गळिताची धान्ये, तंबाखू, मसाल्याची पिके व फळे आणि भाजीपाला यांचेही उत्पादन होते.
प्रश्न २ उस्मानाबाद जिल्ह्यात
किती तालुके आहेत?
उत्तर : उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा, भूम, उस्मानाबाद,
तुळजापूर, कळंब, उमरगा, वाशी, लोहारा असे एकूण ८ तालुके आहेत.
प्रश्न ३ उस्मानाबाद चे जुने नाव काय?
उत्तर : उस्मानाबादचे पूर्वीचे नाव धाराशिव असे होते. उस्मानाबाद हे नाव हैदराबाद संस्थानचा निझाम मीर उस्मान अली खान याच्या नावावरून पडले.
अशाप्रकारे आपला आजचा लेख पूर्ण झाला. आज आपण महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याची माहिती बघीतली. त्यामध्ये सुरवातीला आपण उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास बघितला. त्यानंतर आपण भौगोलिक माहिती, सीमा, उस्मानाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ, तालुके किती व कोणते, जिल्ह्याची लोकसंख्या, वनक्षेत्र, नद्या, धरणे, हवामान, पिके या सर्वांबद्दल विस्तृत माहिती बघितली आणि शेवटी आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती बघितली. अशाप्रकारे आपला आजचा लेख पूर्ण झाला.
या लेखाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि या लेखात असलेल्या माहिती व्यतिरिक्त तुमचा जवळ उस्मानाबाद जिल्ह्याबद्दल जास्तीची माहिती असल्यास आम्हाला नक्की कळवा आम्ही या लेखात ती समाविष्ट करू.